Shivaji raje bhosle powada in marathi

हिंदवी राज्य स्थापून । मोठ्या हिंम्मतीनं । शूर शिवाजीनं ।
राज्याभिषेक समारंभ खास । केला यथाविधी रायगड किल्ल्यास ।
ऐका शिवशाहीचा इतिहास ॥

कोण मानीत नाही कोणाला । देवादिकाला । देश धर्माला ।
जुलुम जबरदस्ती अन्याय फार । असा भूमीवर वाढता भार ।
देवाला घ्यावा लागतो अवतार ॥

या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शीवअवतार झाला.
या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील बाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्यांनी,

स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला ।
गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला ।
पण आर्थिक प्रश्‍न महत्त्वाचा भासू लागला ।

'हिंम्मत मर्दा तो मदद खुदा'
याचवेळी विजापूराहून निघालेला 'कल्याण खजिना', स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत,

शिवाजीचे वर्णु गूण किती । न्याय आणि नीती । सदाचार प्रीती ।
कल्याण खजिन्याच्या लुटीत एक महान । तरुणी लाभली रूपाची खाण ।
पण तिच्यापुढे नमुनी मान । मानुनी तिला मातेसमान ।
परस्त्रीचा या केला बहुमान । असा शिवराय चारित्र्यवान ॥

विजापूरचा अफझुलखान । शिवाजीला करण्या हैराण ।
किंवा त्याचा घ्यावया प्राण । पैजेचा विडा उचलून ।
आला प्रतापगडावर जाण । पण त्या अफझुलखानाला शिवाजी राजानं ।
कायमचा बसविला तिथंच कबर बांधून ॥

मग फाजिल सिद्दी आला । पन्हाळगडी वेढा टाकला ।
त्यातून शिवबा निसटला । विशाळगडी पोचता झाला ॥

मग दिल्लीहून तडफेनं । चाळीस हजार फौज घेऊन ।
आला मामा शाहिस्तेखान । पुण्यामधे कडक शिस्तीनं ।
बैसला तळ ठोकून । पण त्याला शिवाजीराजानं ।
अचानक रात्री गाठून । घेतली बोटे कापून ।
जिवावरील संकट बोटावर भागवून ।
शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून ॥

पुढे औरंगजेबाने आपला । राजकारणी डाव खेळलेला ।
मुत्‍सदी व धोरणी असलेला । मिर्झाराजा जयसिंग आला ।
शिवाजीवर पाठवून दिला । त्यानं पुरंदर वेढिला । तोफांचा भडिमार केला ।
जोराचा हल्ला चढविला । शिवाजीनं अशा वेळेला । जाणून भविष्यकाला ।
माघारी पाय घेतला । तडजोडीने किल्ले दिले-गेले एकमेकाला ।
त्यामुळे मिर्झा राजा तो मानी शिवबाला ॥

शिवाजीचे नाव गाजले । शत्रूही मित्र जाहले ।
जसे पोथ्या-पुराणे आपुले ।
तसे बायबल-कुराण मानिले, कुराण मानिले ॥

शिवाजीची कीर्ती पसरली । चहुंकडे भली । सहन नाही झाली ।
दिल्लीपती औरंगजेब बादशहास । मिर्झा राजा जो दक्षिण भागात ।
त्याच्या मार्फत शिवाजी राजास । वाढदिवसाच्या निमित्ताने खास ।
हिकमतीने बोलावून शिवबास । नजरकैदेत ठेविले आग्र्यास ॥

पण शिवाजीही शेराला सव्‍वाशेर होता.

हातोहात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला ।
दिल्ली सम्राट थक्क झाला । म्हणे, "ये क्या हुआ अल्‍ला?



दिल्लीच्या बादशहाची कायमची झोप उडवून शिवाजी महाराष्ट्रात आल्याची बातमी पसरताच,

विजापूरच्या आदिलशहाला । परस्पर धक्का हा बसला ।
जशास तसे वागण्याला । शिवाजीने विचार केला ।
आणि तडजोडीने त्याला । दिलेले किल्ले मोंगलाला ।
पुन्हा फिरून सर करण्याचा प्रारंभ केला ॥

वीस वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन ।
महाराष्ट्राचा मुलुख शिवाजीनं घेतला जिंकून ।
स्वराज्याचे स्वप्‍न साकार झाले मानून ॥

शिवाजीच्या राज्याभिषेकाला । शास्त्र निपूण भारतभूला ।
अशा गागाभटाने अपुला । संपूर्ण पाठिंबा दिला ।
आणि सांगितले सर्वाला । चार यवनी पातशाहीला ।
शिवाजीनं सुरुंग लावला । असा मराठा राजा आपला ।
छत्रपति जहाला पाहिजे महाराष्ट्राला ।
ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला ॥

रायगडावर अष्टप्रधानांनी । वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी ।
अभिषेक केला शिवाजी राजास । विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास ।
प्रतिनिधी हजर समारंभास ॥

शिवशक सुरू जाहला । राज्याभिषेकाला । आणा ध्यानाला ।
अशा शिवछत्रपती चरणास । मुजरा त्रिवार करून समयास ।
शाहीर पिराजी गातो कवनास ॥

महाराष्ट्रातील नामवंत शाहीर पिराजीराव सरनाईक गेली पन्‍नास वर्षे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही आपल्या स्फूर्तीदायक पोवाड्यांनी सुविख्यात आहेत.

मराठ्यांच्या इतिहासातील अनेक पराक्रमी प्रसंग निवडून ते वीरश्रीयुक्त काव्यात गुंफण्याचे त्यांच्याजवळ शब्दवैभव आहे. तसेच ते शौर्यशाली प्रसंग हजारो लोकांच्या सभेसमोर खड्या आवाजात गाऊन दाखविण्याचे स्वरवैभवही आहे. अशा गुणी शाहिराचा काव्यसंग्रह वाचकांना इतिहासाची आणि सामाजिक स्थितीची जाणीव करून देतो.

शाहीरी वाङ्मय अलीकडच्या काळात मागे पडत चालले आहे. एकेकाळी मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शाहीर समाजाचे भूषण मानले जात होते.

इतिहासाचा तो शौर्यशाली कालखंड संपल्यावरही भारताच्या स्वातंत्र्य-संग्रामात मराठी शाहीरांनी पुन्हा एकदा आपले तेजस्वी काव्य गाऊन स्वातंत्र्य प्राप्तीची प्रेरणा दिली. कालमानाप्रमाणे शाहीरी वाङ्मयाचे विषय बदलले पण त्यांचे कार्य तेवढेच मोलाचे ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र ही परिस्थिती बदलली. शाहीरी वाङ्मयाला एका अर्थाने ओहोटी लागली.

पोवाडे आणि तत्सम स्फूर्तीदायक शाहीरी गीते मागे पडू लागली व भावगीतांना भरती आली.

शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे वैशिष्ट्य असे की अशा बदलेल्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या ओजस्वी गीतांनी आणि तडफदार गायन पद्धतीने शाहीरी साहित्याचा प्रवाह जोमाने चालू ठेवला. एवढेच नव्हे तर तो लोकप्रिय करण्याचे प्रयत्‍न केले. हे विधान त्यांनी आजवर केलेल्या पोवाड्यांच्या संख्येवरून सिद्ध होण्यासारखं आहे.

Petronel malan transfigured beethoven biography

तसेच, त्यांच्या गुणांवरून्ही लक्षात येण्यासारखे आहे.

पिराजीरावांची चार दैवते आहेत. देव, संत, शूरवीर आणि मायभूमी. या दैवतांच्या प्रेरणेनेच शाहीरांनी आपली गीतगंगा प्रवाहित ठेवली आहे. त्यांच्या काव्यात ऐतिहासिक प्रसंगांबरोबर सामाजिक प्रबोधनाचे विषयही प्रभावीपणे व्यक्त झालेले आहेत. अस्पृश्यता निवारण, विकास योजना, कुटुंबनियोजन, शिक्षणप्रचार, मद्यपानबंदी, दुष्काळी परिस्थिती यांसारख्या सामाजिक विषयांचा शाहीरांनी समयोचित परामर्श घेतला आहे.

पोवाडे, संवाद, गाणे, अभंग, ओव्या यासारख्या निरनिराळ्या पद्धती उपयोगात आणून त्यांनी आपली स्वत:ची एक कथनशैली निर्माण केली.
(संपादित)

सदाशिव मार्तंड गर्गे
'करवीर दरबार शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे पोवाडे' या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, कोल्हापूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment earlier printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Copyright ©blueicy.bekas.edu.pl 2025